सर्वसामान्य नागरिकांना आपल्या दैनंदिन जीवनात ऐनवेळी अनेक समस्या आपल्यासमोर अकस्मात उभ्या राहतात. अशावेळी आपणांस मदतीची अत्यंत आवश्यकता असते. मात्र, ही मदत कोणाकडून मिळेल, कुठे आणि कशी मिळेल, त्या मदतीसाठी कोणाकडे कशा पद्धतीने संपर्क साधता येईल, याबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांनी क्रमांक जाहीर केले आहेत. नागरिकांना अडचणीच्या वेळी तात्काळ कोणाकडे संपर्क साधावा, याबाबत काही सुचत नाही, त्यांना याची माहिती नसते. त्यामुळे राज्य शासनाच्या विभागांनी नागरिकांमध्ये या क्रमांकाची जनजागृती व्हावी.
त्यांना अत्यावश्यक सेवेचे हे क्रमांक सहज उपलब्ध व्हावेत. त्यांच्या सहज नजरेस पडावेत. ‘गोल्डन अवर्स’मध्ये बचत होऊन रुग्ण, पीडित अथवा त्यांच्या नातेवाईंकांना रुग्णालयाशी, संकट काळात पोलीस यंत्रणेशी, अग्निशमन यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधता यावा. अशा रुग्ण अथवा संकटात सापडलेल्या व्यक्तीला, पीडिताला तात्काळ मदत मिळून त्याचे प्राण वाचावेत, यासाठी राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग व हिंगोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाकडून ही जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकहो, आपल्यासाठी काही महत्त्वाचे क्रमांक अत्यंत उपयुक्त आहेत.
108 : हा आपत्कालीन सेवांसाठी एक नि:शुल्क कॉलिंग टेलिफोन नंबर आहे. संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे हा क्रमांक आपत्कालीन वैद्यकीय सेवा तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी वापरला जातो. मुख्यतः सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत आणि भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा क्रमांक सुरु करण्यात आला आहे.
104: या नि:शुल्क क्रमांकावरून रुग्णांना घरबसल्या आरोग्यविषयक सल्ला दिला जातो. या क्रमांकावर रुग्ण अथवा नातेवाईकांनी संपर्क साधल्यास रक्ताची उपलब्धता, तक्रारनिवारण आणि मानसिक आरोग्यविषयक सल्ला दिला जातो.
102 : नागरिकांना या क्रमांकांची सेवा ही जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमासाठी घेता येते. हा क्रमांक राज्यात मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांसाठी कार्यान्वित आहे. या नि:शुल्क क्रमांकावरून रुग्णांना मोफत संदर्भ सेवा वाहतुकीसाठी मदत होते.
155388 आणि 18002332200 : राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी हे दोन्ही क्रमांक अत्यंत अपयुक्त आहेत. या क्रमांकावरून रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभासाठी नि:शुल्कपणे संपर्क साधून आरोग्य सेवेचा लाभ घेता येतो. त्यामुळे सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे नि:शुल्क क्रमांक सेव्ह असायलाच हवेत.
18002334475 : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) वापरण्यासाठी हा क्रमांक जारी करण्यात आला आहे. या क्रमांकावरून गरोदर महिलांना गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान करून घेण्यासाठी मदत मिळते.
91-11-23978046 : हा सुद्धा नि:शुल्क क्रमांक असून, देशातील कोणत्याही नागरिकाला आरोग्यविषयक माहिती मिळवता येते. 91-11-23978046 या राष्ट्रीय कॉल सेंटरवर संपर्क साधून आरोग्याच्या तक्रारींबाबत घरबसल्या माहिती घेता येते. रुग्णांचे नातेवाईक किंवा स्वत: रुग्णही वरील क्रमांकावर संपर्क साधून योजनेचा लाभ घेऊ शकतो.
1075 व 911123978046 : या दोन्ही क्रमांकावर संपर्क साधून राष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून रुग्ण अथवा नातेवाईक आरोग्य विषयक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व लाभ घेऊ शकतात. देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागात डॉक्टरांसह वैद्यकीय सेवांची उपलब्धता दुर्मिळ आहे. अशा परिस्थितीत, ग्रामीण आणि मागास/डोंगरी भागात राहणाऱ्या लोकांना सल्ला सेवा प्रदान करणारी व्यवस्था असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे येथेच ई-संजीवनी ओपीडी उपयुक्त ठरू शकते. साथीच्या काळात, रुग्णांनी आजारांसाठी डॉक्टरांशी सल्लामसलत करण्याचा मार्ग शोधणे महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांना रुग्णालये/ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाण्यापासून रोखता येते आणि विशेषतः कोविड-19 संसर्गाचा धोका, प्रसार रोखण्यासाठी आणि त्याच वेळी गैर-कोविड आवश्यक आरोग्यसेवेसाठी तरतुदी सक्षम करण्यासाठी सेवा अत्यंत फायदेशीर ठरली आहे.
14416 व 18008914416 : सध्याच्या काळात मोबाईल आपल्या हाती आल्यामुळे माणूस माणसापासून दूर चालला आहे की काय, अशी शंका घेण्याइतपत परिस्थिती बदलत असल्याचे सार्वत्रिक चित्र निर्माण झाले आहे. एकमेकांसोबत, एका खोलीत बसूनही प्रत्येकजण समाजमाध्यमांतून जाळ्यात ओढला जातो आहे. अर्थात मोबाईलवर जास्त वेळ घालवल्यामुळे समोर बसलेल्या व्यक्तीपेक्षाही जास्त मोबाईलमधील समाज माध्यमांच्या आभासी जगात वावरत आहे. त्यामुळे अनेकजण याचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी अनेकाचे मानसिक संतुलन बिघडत असून, त्यांच्या मानसिक आरोग्य पुनर्वसनासाठी या क्रमांकावर सल्ला घेता येणार आहे.
1800112356 : व्यसनाधीन तरुणांना किंवा व्यसन करणाऱ्यांना व्यसनमुक्त विषयक मार्गदर्शन करण्यासाठी आहे.
1800116666 : भारत क्षयरोग मुक्त करण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नरत असून, क्षयरोगावर नियमित उपचार केल्याने बरा होतो. क्षयरोगींना मार्गदर्शन करण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने 1800116666 हा नि:शुल्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
022-24114000 : या क्रमांकाचा उपयोग कुष्ठरोगविषयक मार्गदर्शनासाठी करण्यात येतो.
8080809063 : महिला व बालविकास विषयक सेवांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या क्रमांकाचा राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने हा क्रमांक जारी केला आहे.
1077 : आपत्ती व्यवस्थापन विभागाने हा क्रमांक संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी जारी करण्यात आला आहे. वरील सर्व नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी लाभ घ्यावा.
– प्रभाकर बारहाते.
जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली.