मुंबई, 16 फेब्रुवारी (हिं.स.) – १४४ वर्षांतून एकदा येणार्या महाकुंभमेळ्याला भारतातील ५० कोटींहून अधिक हिंदू भाविक आणि ५० हून अधिक देशांतील लाखो विदेशी मोठ्या श्रद्धेने येत आहेत. आनंद अनुभवत आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ, अभ्यासक आणि विचारवंत महाकुंभाच्या अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वाची दखल घेतात. अशा वैश्विक महोत्सवाला ‘फालतू’ म्हणणारे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री आणि राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. हिंदु जनजागृती समिती या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करत असून लालूप्रसाद यादव यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे करत आहे.
दिल्लीतील रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना लालूप्रसाद यादव यांना महाकुंभमेळ्यातील गर्दीबाबत विचारले असता “कुंभला काही अर्थ नाही. कुंभ फालतू आहे”, असे आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
लालूप्रसाद यादव यांनी कधीही अन्य धर्मियांच्या तीर्थयात्रांबाबत अशा प्रकारचे अपमानास्पद वक्तव्य केले आहे का? हिंदु धर्म आणि त्यांच्या श्रद्धास्थानांचा अपमान करण्याची ही प्रवृत्ती हिंदू समाज सहन करणार नाही. अनेक वर्षे तुरुंगात काढल्यानंतरही अपराधांविषयी खंत वाटत नसलेल्या लालूप्रसाद यादव जामिनावर बाहेर असताना ते हिंदू समाजाच्या श्रद्धास्थानांचा अपमान करणारी वादग्रस्त विधाने करत असतील, तर हा समाजात तेढ निर्माण करण्याचा आणि हिंदूंच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न आहे. याची सरकारने गंभीर दखल घेतली पाहिजे, असेही समितीने म्हटले आहे.