बुलडाणा, 4 मार्च (हिं.स.) : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आवश्यक कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना
बुलढाणा जिल्ह्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत एकुण 2 लक्ष 34 हजार 398 लाभार्थी आहेत. त्यापैकी राज्य शासनाचे संजय गांधी व श्रावणबाळ योजनेअंतर्गत 1 लक्ष 81 हजार 1 लाभार्थी आहेत. तर केंद्र शासनाचे इंदिरा गांधी विधवा, दिव्यांग, वृद्धापकाळ योजनेचे 53 हजार 397 लाभार्थी आहेत. या दोन्ही योजनाच्या लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासुन डिबीटीद्वारे अनुदान वाटप होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे. आवश्यक कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे जिल्ह्यातील 2 लक्ष 34 हजार 398 लाभार्थ्यांपैकी 64 हजार 266 लाभार्थ्यांच्या खात्यात माहे जानेवारी 2025 या महिन्याची अनुदान रक्कम (प्रत्येक मासिक 1500 रुपये) जमा झालेली नाही. ज्या लाभार्थींना अनुदानाची रक्क्म बँक खात्यात जमा झालेली नाही, त्यांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.
संजय गांधी निराधार अनुदान योजना
लाभार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड व बँक पासबुक संजय गांधी शाखा तहसिल कार्यालय, सबंधित गावचे तलाठी अथवा कोतवाल यांच्याकडे जमा करावे किंवा तहसील कार्यालयामार्फत घेण्यात येणाऱ्या अग्रीस्टॅक, विविध प्रमाणपत्र वाटप शिबिर ठिकाणी जमा करावे.(यापुर्वी जमा केले असल्यास परत जमा करण्याची आवश्यकता नाही), लाभार्थ्यांनी आधार सेवा केंद्राद्वारे आपले आधार अद्यावत असल्याची खात्री करावी. आधार अद्यावत नसल्यास ते अद्यावत करुन घ्यावे. डिबीटी प्रणलीद्वारे अर्थसहाय्य प्राप्त करण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते व मोबाईल क्रमांक आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे. यासाठी लाभार्थ्यांनी बँक शाखेत जाऊन अथवा http://resident.uidai.gov.in/bankmapper या वेबसाईटवर आधार संलग्न (आधार सिडिंग) असल्याची खात्री करावी. आधार संलग्न नसल्यास आधार सिडींगचा फार्म बँकेत भरुन द्यावा, अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे तहसिलदार यांनी दिली आहे.