मुंबई, 20 मार्च (हिं.स.) राज्यात 12.8 कोटी नागरिकांची आधार नोंदणी झाली असून, 5 ते 18 वयोगटातील शंभर टक्के नोंदणी झाली आहे. तसेच 0 ते 5 वयोगटातील नोंदणी 39 टक्के आहे. त्यामुळे या वयोगटात एका महिन्यात सर्वात जास्त नोंदणी करणाऱ्या सेंटरला 1 लाखांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज केली.
राज्यातील आधार कार्ड नोंदणी करणाऱ्या सेंटरना माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे नवीन संचाचे वाटप करण्यात येणार असून आज सह्याद्री अतिथीगृहावर या योजनेचा शुभारंभ मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नौनोटीया आणि संचालक अनिल भंडारी, उपनगर जिल्हाधिकारी राजेद्र शिक्षरसागर आदी उपस्थित होते.
आज शुभारंभ करताना प्रातिनिधिक स्वरूपात मुंबई, शहर, उपनगर, ठाणे, पालघर विभागातील आधार कार्ड सेंटर चालकांना या संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी पराग जैन यांनी सांगितले की, नवीन आधार कार्ड तयार करताना विशेषतः 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांमध्ये बांग्लादेशी घुसखोरी करु नये याची काळजी घ्या, अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले की, आधार नोंदणी केंद्र ही सेवा केंद्र असून मंदिराचे पावित्र त्यांनी जपावे. अनावधानाने ही कुठली चूक झाली तर देशासाठी ही बाब घातक ठरेल. आता देशातील मतदार आणि आधार लिंक करण्याबाबत देश पातळीवर चर्चा जेव्हा सुरु झाली आहे तेव्हा महाराष्ट्र हे राज्य असे आहे जे ही यंत्रणा सक्षम व अद्ययावत करण्यात पुढाकार घेत आहे. राज्यातील आधार संचामध्ये वाढ करण्याबाबत आपण विचार करीत आहोत. तसेच येणाऱ्या काळात अधिक संच उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असून केंद्र चालवणाऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात वाढ करता येईल का? याबाबत देखील सरकार सकारात्मक विचार करीत आहे असेही त्यांनी सांगितले. डिजिटल सुविधा हा नागरिकांचा अधिकार झाला असून ही सेवा देणारे आपण सेवक आहोत आपण जबाबदारीने काम केले पाहिजे असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.