नंदुरबार, 6 मार्च (हिं.स.) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दहावी, बारावी व त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन 2024-25 या वर्षासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज भरण्यासाठी 15 मार्चपर्यत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी कळविले आहे.
शहरातील महाविद्यालयामध्ये प्रवेशित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास, निर्वाह भत्ता तसेच शैक्षणिक भत्ता इ. सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे. ही योजना आता तालुकास्तरावर देखील लागु करण्यात आलेली आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना https://hmas.mahait.org या पोर्टलवर स्वाधार योजनेचे
अर्ज भरता येणार आहेत. ऑनलाईन पोर्टल हे वसतिगृह प्रवेश प्रक्रिया व स्वाधार योजनेसाठी एकत्रित तयार केलेले असून सर्व प्रथम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार शासकीय वसतिगृहास निवड होईल. तसेच पात्र असूनही ज्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेअभावी शासकीय वसतिगृहात निवड होणार नाही अशा पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वाधार योजनेसाठी ग्राह्य धरले जातील. विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा अर्ज विहित मुदतीत ऑनलाईन भरून ऑफलाईन अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधित वसतीगृहाचे गृहपाल/ सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नंदुरबार येथे सादर करावा.
यासाठी विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा, विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द या प्रवर्गातील असावा, विद्यार्थ्यांने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या-ज्या वेळी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकाची उत्पन्न वार्षिक मर्यादा त्याप्रमाणे राहील, विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक व त्याने ज्या बँकेत राष्ट्रीयकृत / शेडुल्ड बँकेत खाते उघडले असेल त्या खात्याशी संलग्न असावे, विद्यार्थ्यांचा पॅन कार्ड अनिवार्य आहे, विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा, पदवी, पदविका, दोन वर्षापेक्षा कमी नसणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास सदर विद्यार्थ्यास पुढे लाभ घेण्यासाठी किमान 50 टक्के
गुण किंवा त्याप्रमाणात ग्रेडेशन/सीजीपीओ असणे आवश्यक राहील, विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ अनुज्ञेय होण्यासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे इतकी निश्चित करण्यात आली आहे, तसेच शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी या योजनेचा लाभासाठी पात्र असेल तथापि, शिक्षणातील खंड हा 2 वर्षापेक्षा जास्त असु नये. असेही श्री. वसावे यांनी कळविले आहे.