अमरावती, ३० जुलै – मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत प्रत्येक कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच लाभ देण्याचा नियम असताना, अनेकांनी नियमांचे उल्लंघन करत तीसऱ्या-चौथ्या महिलांचेही अर्ज सादर केले. काहींनी रेशनकार्ड वेगळे असल्याचे भासवले, काहींनी वय १८ पूर्ण नसतानाही ते पूर्ण असल्याचे दाखवून लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला.
‘एफएससी मल्टिपल इन फॅमिली’ शेरा; लाभ बंद होणार
अशा प्रकरणांमध्ये आता संबंधित लाभार्थ्यांच्या नावासमोर ‘FSC – Multiple in Family’ असा शेरा लावला जाणार असून, त्यांचा लाभ पुढील महिन्यापासून बंद होणार आहे.
पुरुषांनीही घेतला लाभ; गंभीर प्रकार उघड
या योजनेचा लाभ राज्यातील १४,२९८ पुरुषांनीही घेतल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील पुरुषांचा समावेश आहे का, याची चौकशी सुरू आहे.
अमरावती जिल्ह्याचा आढावा
-
एकूण अर्जदार महिला: ७,२०,६३५
-
मंजूर अर्ज: ६,९५,३५०
-
नाकारण्यात आलेले अर्ज: २९,९३७
अनेक महिलांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमी दाखवून, तसेच रेशनकार्ड वेगळे दर्शवून पात्रतेच्या बाहेर जाऊन लाभ मिळवला आहे.
पडताळणी सुरू; उत्पन्न आणि अटींची शहानिशा
योजनेसाठी खालील अटी लागू आहेत:
-
वय १८ ते ६५ दरम्यान असावे
-
वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे
-
प्रत्येक कुटुंबातून केवळ दोन महिलाच पात्र
-
कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे
आता याच अटींच्या आधारे पुढील महिना पासून पुनर्पडताळणी सुरू होणार आहे.
या महिलांचा लाभ बंद
खालील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही:
-
वय ६५ वर्षांपेक्षा जास्त
-
स्वतःकडे किंवा कुटुंबाकडे चारचाकी वाहन असणाऱ्या
-
संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनेचे लाभार्थी
-
१८ वर्षे पूर्ण नसताना अर्ज केलेले
एकाच वेळी दोन योजना बेकायदेशीर
अनेक महिला सध्या ‘माझी लाडकी बहीण’ आणि संजय गांधी निराधार योजना दोन्हीचा लाभ घेत आहेत. आता यावर नियंत्रण आणले जाणार असून, फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे.


