मुंबई , 26 फेब्रुवारी ।यंदाच्या वर्षी राज्यात होळी आधीत उष्णतेला सुरुवात झाली आहे. हवेतील गारवा कमी होण्यास सुरुवात झाली असून आता कडाक्याचे ऊन पडू लागले आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच नागरिकांना चटके जाणवू लागले आहेत.त्यामुळे महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. पुढील पाच दिवसांमध्ये तापमानाच्या पाऱ्यात आणखी वाढ होणार असून राज्यातील सहा जिल्ह्यांना हवामान विभागाकडून (आयएमडी) उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आलाय.तर उत्तर आणि दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात मुंबई व कोकणपट्ट्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला आहे. राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ३७ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाच्या नोंदी होत आहेत. उन्हाची धग वाढली आहे.येत्या ५ दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याचे संकेत देण्यात आले आहे. आज (२६ फेब्रुवारी) रोजी मुंबईसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या तीन दिवसात संपूर्ण कोकणपट्ट्यात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार असून उर्वरित महाराष्ट्रात शुष्क व कोरडे हवामान नोंदवले जात आहे.
मागील दोन दिवसांपासून नागरिकांना उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उत्तर पाकिस्तानला जोडून हिमालयाच्या पायथ्याशी पश्चिमी चक्रवात तयार झाला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर, लडाख हिमाचल प्रदेशसह पंजाब, हरियाणा, राजस्थानपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे दक्षिणेत अंदमान आणि निकोबार बेटांवर चक्राकार वारे वाहत असल्याने तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांनाही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ईशान्य भारतातही पावसाचा अंदाज आहे. पुढील तीन दिवसही संपूर्ण कोकणपट्ट्यात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार असून उर्वरित महाराष्ट्रात शुष्क व कोरडे हवामान नोंदवले जात आहे.
इथे हि वाचा
पीएम किसान योजनेचा 19 व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात
उद्धव-राज एकत्र आले तरी युतीला धोका नाही; आठवलेंचा टोला
Car ची बॅटरी डाऊन झाली? या पद्धतीने सहज सुरू करा गाडी!